Ad will apear here
Next
मार्लेश्वरची डोंगरलेणी

कोकणातली डोंगरातली, आडबाजूची शिवमंदिरं ही संस्कृतीची, निसर्गाची एक सुंदर देणगी आहे. आजच्या ‘चला भटकू या’च्या भागात करू या अशाच रम्य अशा मार्लेश्वर मंदिराची आणि धबधब्याची सफर...
...................
कोकणातली डोंगरातली, आडबाजूची शिवमंदिरं ही संस्कृतीची, निसर्गाची एक सुंदर देणगी आहे. प्राचीन काळात बांधली गेलेली ही मंदिरं डोंगरात आडबाजूला असली, तरी आता तिथे जाण्याच्या वाटा सोप्या झाल्या आहेत. डोंगराच्या कपारीत कोरून काढलेली रचना, प्रचंड मेहनत घेऊन घडवलेली अप्रतिम शिल्पं आणि बाजूलाच वाहणारे असंख्य झरे, ओहोळ आणि काही धबधबे असा हा निसर्ग अक्षरशः वेड लावणारा. काही मंदिरं डोंगरातल्या सपाट जागी, व्यवस्थितपणे घडवण्यात आली आहेत, तर काही अगदी अवघड अशा जागी बांधलेली. रत्नागिरी जिल्ह्यातलं मार्लेश्वरचं मंदिर हे असंच निसर्गाच्या कुशीत दडलेलं आणि शेजारीच वाहणाऱ्या अफाट धबधब्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात आवर्जून लक्ष वेधून घेणारं.

संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूख या मुख्य ठिकाणापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर डोंगरात हे शिवाचं स्थान आहे. संगमेश्वर या गावाहूनही मार्लेश्वरकडे जाता येतं. मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचण्याआधीच काही अंतरापासून नागमोडी आणि हिरव्या राईनं वेढलेली अशी भन्नाट वाट सुरू होते. हा घाट कोकणाची सगळी वैशिष्ट्यं दाखवत आपलं लक्ष वेधून घेतो. मध्येच डोंगरातला एखादा चुकार धबधबा आपल्याला वाकुल्या दाखवतो, तर कधी माकडांची टोळी आपली वाट अडवून बसते. कधी झाडीतून अवखळपणे वाहणारा एखादा ओहोळ त्याचा प्रवाह शोधण्यासाठी आपल्याला आव्हान देत राहतो. निसर्गाच्या या वेगवेगळ्या रूपांचा आस्वाद घेत, नागमोडी वाटेचा आनंद लुटत आपण मार्लेश्वरच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. इथे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. गाड्या त्याच ठिकाणी सोडून डोंगरात वसलेल्या मार्लेश्वर देवस्थानाची वाट आता चढून जायची असते. डोंगरातला हा प्रवास निसर्गाच्या साथीनं आणि बांधलेल्या भक्कम पायऱ्यांवरून होतो. मार्लेश्वर मंदिराची कमान लक्ष वेधून घेते आणि आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे सातशे पायऱ्या असल्या, तरी ही वाट डोंगराच्या कडेकडेने जात असल्यामुळे प्रवासाचा थकवा जाणवत नाही. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी, अशा या प्रवासात अखंड झाडांच्या कमानी, धबधबे आणि पावसाचीही साथ असते.

मार्लेश्वर मंदिर एका छोट्या गुहेत वसलेलं आहे. या गुहेचं तोंड छोटं असून आत प्रवेश करताना जपून करावा लागतो. या गुहेत दोन शिवपिंड्या आहेत, त्यातली एक मल्लिकार्जुन, तर दुसरी मार्लेश्वर या नावानं ओळखली जाते. या स्थानाची निर्मिती झाली, तेव्हा तिथे पार्वती नव्हती, असं सांगितलं जातं. म्हणूनच दर मकर संक्रांतीला या देवस्थानाच्या ठिकाणी शिव-पार्वतीचं लग्न लावलं जातं. ‘मार्लेश्वर’ हा वर, तर साखरपा या गावची ‘गिरिजादेवी’ ही वधू समजून लग्न लावले जाते. साखरप्यातून ‘गिरिजाईदेवी’ पालखीतून मारळ या गावातून मार्लेश्वरला आणली जाते आणि तिथे हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडतो. मकरसंक्रांतीचा आधीचा दिवस आणि संक्रांत या दोन दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण अतिशय मनोरम आहे. धार्मिक नसलेला माणूसही केवळ पर्यटनाच्या हेतूने या ठिकाणी येऊन छान रमू शकतो. मार्लेश्वर मंदिर परिसराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेला अफाट धबधबा. मंदिरापासून थोडं पुढे गेलं, की एका डोंगराच्या कड्यावरून बेफामपणे स्वतःला खाली झोकून देणारा हा धबधबा दिसतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं. धबधबा म्हणजे मनसोक्त आंघोळ, असं गणित असलं, तरी पावसाळ्यात या धबधब्याचा प्रवाह एवढा जोराचा असतो, की त्याच्या धारेच्या आसपासही फिरकता येत नाही. हा धबधबा जिथे पडतो, तिथे एक मोठं, खोल कुंड तयार झालं असून, तिथूनच नदीचा उगम होतो. हीच संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध बावनदी. धारेश्वर या नावाने हा धबधबा ओळखला जातो. पाऊस ओसरल्यानंतर काही काळानंतर या धबधब्यापर्यंत जाण्याची संधी मिळते; मात्र तरीही एकूणच प्रवाहाचा अंदाज घेऊन आणि योग्य सल्ला घेऊन जाणं श्रेयस्कर.

कसं जायचं?
देवरूखपासूनचं अंतर १८ किलोमीटर, संगमेश्वरपासूनचं अंतर ३० किलोमीटर.
पुण्यापासून सुमारे २७० किलोमीटर. (उंब्रज-पाटण-कोयना-चिपळूणमार्गे)
मुंबईहून अंतर सुमारे २९० किलोमीटर (पनवेल-पेण-खेड-चिपळूणमार्गे)

कसब्याचं कर्णेश्वर मंदिर
संगमेश्वर तालुक्यातलंच आणखी एक प्रेक्षणीय मंदिर म्हणजे कसब्याचं कर्णेश्वर मंदिर. मार्लेश्वरपासून या मंदिराचं अंतर सुमारे ३५ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर शहराजवळ दोन किलोमीटरवर महामार्गालगत हे मंदिर आहे. चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना शास्त्री नदीवरचा पूल ओलांडल्यावर डावीकडे कसबा गावाकडे जाणारा रस्ता आहे. तिथे मंदिराकडे जाण्याची पाटीही आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. 

कसबा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सरदारांनी पकडलं ते ठिकाण. कसबा गावात सुरुवातीला संभाजी महाराजांची समाधीही आहे. एका दगडातून कोरलेलं भव्य मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. देवळाच्या आवारात प्रवेश केल्यावरच समोरची भव्य आणि कोरीव रचना पाहून मन प्रसन्न होतं. देवळाच्या शिल्पकारांच्या कौशल्याला आणि मेहनतीला आपण मनापासून दाद देतो. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दरवाज्यात एक पालथे ताट आहे. अशी एकूण सहा ताटं या देवळात आहेत. पांडवांनी अज्ञातवासात असताना आपला मोठा भाऊ कर्ण याची आठवण म्हणून एका रात्रीत एका दगडातून हे मंदिर कोरून काढलं आणि पहाट झाल्यामुळे जेवणाची ताटं ते तशीच टाकून गेले, अशी एक आख्यायिका आहे. सुमारे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली ताटं हे देवळाचं एक वैशिष्ट्य आहे. 

मंदिरातली शिल्पकला अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. मुख्य मंडपात नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंडपाला चार खांब असून, चारही एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याजवळील खांबावर शिलालेख कोरलेला दिसतो. पांडवांच्या पाच ताटांबरोबर कर्णाचं म्हणून सहावं ताट दिसतं, त्यावर नंदीची मूर्ती आहे. महालक्ष्मी, शेषशायी विष्णू, देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी अशा अनेक मूर्ती देवळात असून, त्यांचं कोरीवकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचं मंदिर आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी. मंदिराच्या मागेच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगमही पाहायला मिळतो.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZTFBE
 सर खुप रम्य ठिकाण आहे मार्लेश्वर, मि 2013 मधे गेलो होतो, खुप शांत ठिकाण आहे, तिथे मोबाईल ला पन नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे खुप शांत वाटत. खुप भयानक शांतता भेटते तिथे, अप्रतिम
 Really marvellous.
PRAKASH AJAREKAR
Similar Posts
थाटात रंगला देवांचा विवाहसोहळा देवरुख (रत्नागिरी) : शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्वरचा विवाह रविवारी (१४ जानेवारी) दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टक, तसेच मंत्रांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटात झाला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत शनिवारपासून गर्दी केली होती
... आणि मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाह झाला! देवरुख : सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळनगरीत (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या हजारो भाविकांनी आज (१५ जानेवारी २०१९) मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री देव मार्लेश्वर आणि कोंडगावची वधू गिरिजादेवी यांचा विवाह दुपारच्या मुहूर्तावर झाला
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग तीन ‘करू या देशाटन’ या सदरात सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात पाहू या संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांतील काही पर्यटनस्थळांबद्दल....
जुन्नर ते मार्लेश्वर : दिव्यांग व्यक्तीची पदयात्रा देवरुख : जुन्नर ते मार्लेश्‍वर हे शेकडो किलोमीटरचे अंतर सर्वसामान्य धडधाकट माणसाने कापायचे म्हटले, तरी ते अशक्यच आहे; मात्र सर्वसामान्यांना अशक्य वाटणारी ही गोष्ट एका ४९ वर्षीय अपंग शिवभक्ताने शक्य करून दाखवली आहे. खंडू सरजिने असे त्यांचे नाव असून, गेली १४ वर्षे ते अव्याहतपणे जुन्नर ते मार्लेश्वर असा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language